पराभवाने खचून न जाता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा

अशोक नेते यांचे भामरागड-एटापल्लीत आवाहन

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड व एटापल्ली येथे रविवारी (दि.14) भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होऊनसुद्धा विरोधकांच्या अपप्रचारामुळे लोकसभा निवडणुकीत अपयश आले. पण या निकालावरून कार्यकर्त्यानी व पदाधिऱ्यांनी निराश न होता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

या संघटनात्मक बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मंथन केले. निवडणुकीदरम्यान विरोधकांनी संविधान बदलविणार, तसेच महिलांच्या खात्यात महिन्याला साडेआठ हजार टाकू, असे सांगत मतदारांची दिशाभूल करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात विकासाची दृष्टी ठेऊन देशाला प्रगतीपथावर नेले आहे. दीन दलित, शोषित पीडित, वंचित अशा सामान्य लोकांपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या. परंतू मतदार अपप्रचाराला बळी पडल्याचे गडचिरोलीत पराभव पत्करावा लागल्याचे अशोक नेते म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना महिला भगिनींसाठी अतिशय महत्वाची आहे. महिलांना सशक्त करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावता येणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपला फार्म भरून घ्यावा. माझ्या गडचिरोली आणि चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात महिलांसाठी फॉर्म भरण्याची सोय केली आहे. सर्वच ठिकाणी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या योजनेचा फॉर्म भरून महिला भगिनींना सहकार्य करून लाभ मिळवून द्यावा. बुथ कार्यकर्त्यानी आपला बुथ मजबुत करुन भाजपच्या संघटनेचे काम मजबूत करावे, असे आवाहन मा.खा.नेते यांनी केले.

या बैठकीला प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार यांनीसुद्धा भाजपा संघटनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

भामरागड येथील बैठकीला प्रामुख्याने तालुकाध्यक्ष अर्जुन आलाम, शहराध्यक्ष सम्राट मलीक, नगराध्यक्ष रामबाई कोमटी महाकाय, महामंत्री तपेश हलदार, अनंत बिश्वास तसेच एटापल्लीतील बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम, शहराध्यक्ष निखिल गादेवार, माजी तालुकाध्यक्ष अशोक पुल्लुरवार, ता.महामंत्री मोहन नामेवार, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संपत पैदाकुलवार, आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष संभा जेट्टी, महीला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुनिता चांदेकर, जिल्हा सचिव बाबुराव गुंफावार, शक्तीकेंद्र प्रमुख साईनाथ वेलादी, ता.उपाध्यक्ष सागर मंडल, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.