गडचिरोली : गेल्या 25 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनातील खासदारकीची 10 वर्ष गडचिरोली-चिमूर क्षेत्राच्या विकासाला नवीन कलाटणी देणारी ठरली आहेत. या काळात काय-काय कामे झाली हे लोकांना माहित आहेत. 10 वर्षापूर्वीचे गडचिरोली आणि आताचे गडचिरोली यातील फरक पाहिला तरी हे लक्षात येईल. पण त्याकडे मतदारांचे लक्ष जाऊ नये म्हणून विरोधक वैयक्तिक पातळीवर बिनबुडाचे आरोप करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे आरोप म्हणजे निव्वळ निवडणुकीपुरती चिखलफेक आहे, असे उत्तर खासदार तथा महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी दिले.
खा.अशोक नेते यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. हा आरोप तथ्यहीन आणि दिशाभूल करणारा असल्याचे खा.नेते म्हणाले. माझा संपूर्ण परिवार आदिवासी गोंड जमातीचा आहे. त्याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. जात पडताळणी करताना समिती सर्व कागदपत्रांची तपासणी करते. विशेष म्हणजे १९४९ तरतुदीनुसार मधील सरकारदरबारी नोंद असल्याशिवाय जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाही. असे असताना केवळ निवडणुकीत माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. यासंदर्भात त्यांनी हायकोर्टात नाही तर सुप्रिम कोर्टातही जावे, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे खा.नेते म्हणाले.
बाहेरचा कोण, जनतेलाच ठरवू द्या
मी बाहेरच्या जिल्ह्याचा असल्याचाही आरोप विरोधक करतात. पण माझी जन्मभूमी दुसऱ्या जिल्ह्याची असली तरी माझी कर्मभूमी गडचिरोली जिल्हा आहे. गेल्या 40 वर्षांपासून माझे या जिल्ह्यात वास्तव्य आहे. माझ्या व्यवसायापासून तर राजकीय कारकिर्दीपर्यंत सर्वकाही मला या जिल्ह्याने दिले. त्यामुळे तणमनाने मी या जिल्ह्याशी एकरूप झालेलो आहे. उलट आरोप करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार पाहुणे बनून या जिल्ह्यात आले आहेत. त्यांना या जिल्ह्यातील लोकांच्या वेदना, येथील समस्यांची तळमळ खरंच आहे का, असा पलटवार करत बाहेरचा कोण हे जनतेलाच ठरवू द्या, अशी प्रतिक्रिया खा.अशोक नेते यांनी दिली