मसली, वाकडी आणि शिवणीतील कॅार्नर सभेत मा.खा.नेतेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

डॅा.नरोटे यांनाच कौल देण्याचे आवाहन

गडचिरोली : मसली, वाकडी आणि शिवणी येथे भारतीय जनता पक्ष तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचारासाठी आयोजित कॉर्नर सभेत माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. महायुतीच्या सरकारने ज्या लोकोपयोगी योजना सुरू केल्या त्या इतर कुणाला करणे जमले नाही आणि जमणारही नाही. त्यामुळे तुमचा कौल विकासाची दृष्टी असणाऱ्या डॅा.मिलिंद नरोटे यांना देऊन विजयी करा, असे आवाहन केले.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत संविधानाच्या मुद्द्यावर खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल केली. महिलांच्या खात्यात महिन्याला साडेआठ हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केली. परंतु राज्य सरकारने महिलांच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली, ज्यामुळे 2.40 कोटी महिलांना थेट लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत पाच महिन्याचे 7500 रुपये सर्व महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र काँग्रेसने ही योजना बंद व्हावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली. जनतेला मनात भाजपा महायुतीच्या कामांबद्दल विश्वास वाढला आहे. भाजप महायुतीचे सरकार महिला, युवक, शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताचे सरकार असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे महायुतीचेच सरकार पुन्हा विराजमान होणार असा विश्वास नेते यांनी व्यक्त केला.

यावेळी कलापथकाच्या चमुने गावातील महिलांना, शेतकरी व युवकांना सरकारच्या योजनांसंबंधी माहिती देत जनजागृती केली. यावेळी कॉर्नर सभांना मध्यप्रदेशचे आदिवासी मंत्री विजयशहा कैर, भाजप नेते तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, भाजप नेत्या डॉ.चंदा कोडवते, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, तालुका महामंत्री बंडू झाडे, महिला मोर्चाच्या शहर महामंत्री अर्चना चन्नावार, जिल्हा सचिव लक्ष्मी कलंत्री, विस्तारक आकाश सातपुते, माणिक बांगरे महाराज, संजय बारापात्रे, कान्होजी लोहंबरे तसेच मोठ्या संख्येने मसली, वाकडी आणि शिवणी गावातील नागरिक उपस्थित होते.