गडचिरोली : जिल्ह्यात स्टिल प्लान्टसाठी एक लाख कोटी रुपये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या जिंदल ग्रुपच्या जेएसडब्ल्यू उद्योग समुहाला लोहखाणीचा पट्टा लिजवर देण्यावरून काँग्रेस आणि भाजप (महायुती) यांच्यात आता शाब्दिक लढाई सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार तसेच खासदार डॅा.नामदेव किरसान यांनी महायुती सरकारवर टिका केली होती. त्यावरून भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) तथा माजी खासदार अशोक नेते आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी काँग्रेस नेत्यांचे आरोप फेटाळून लावले.

महायुतीमधील घटक पक्षांना कोणताही आर्थिक लाभ नको आहे, पण लोकांची दिशाभूल करून आरोप करणाऱ्यांकडूनच आर्थिक लाभासाठी धडपड सुरू आहे, असे प्रतिउत्तर नेते यांनी दिले. तसेच आगामी जि.प.निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.
येथील विश्राम भवनात सोमवारी संध्याकाळी झालेल्या या पत्रकार परिषदेला आ.डॅा.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेना (शिंदे)चे जिल्हा प्रमुख हेमंत जंबेवार, माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी, तसेच बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, योगिता पिपरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मा.खा.अशोक नेते यांनी महायुतीची बाजू मांडताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार डॅा.नामदेव किरसान यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. जेएसडब्ल्यू या उद्योग समुहाला जमीन दिल्यास देसाईगंज तालुक्यातील आठ गावे उद्ध्वस्त होईल, त्यांचे पुनर्वसन करावे लागेल, गावकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळणार नाही हे सर्व मुद्दे दिशाभूल करणारे आहेत. वास्तविक तशा पद्धतीचा कोणताही जाहीरनामा काढलेला नाही. त्यामुळे हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि लोकांची दिशाभूल करणारे असल्याचे ते म्हणाले. वास्तविक आता कोणताही प्रकल्प गावापासून 500 मीटर लांब होणार, असा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे प्रदुषणाचा गावांना फटका बसेल किंवा गावं उठवावी लागेल असे म्हणण्यात तथ्य नाही. कमी दराने लोहखाणीची लिज दिली जाणार आणि त्या नफ्याचा वाटा महायुतीच्या पक्षांना मिळणार हे म्हणणेही तथ्यहिन असल्याचे मा.खा.नेते म्हणाले. आरोप करणाऱ्यांनाच आर्थिक लाभ हवा आहे. त्यांनी आमच्यावर असे बेछुट आरोप करू नये, अन्यथा त्यांचीच ईडी चौकशी करावी लागेल, असेही नेते म्हणाले.
वास्तविक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस नेते लोकांची दिशाभूल करून विकासाला विरोध करत आहेत, असाही आरोप यावेळी अशोक नेते यांनी केला.
सहमतीशिवाय विमानतळासाठी अधिग्रहण नाही
गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठी मुरखळा, नवेगाव भागातील जमीन घेण्याला नागरिकांचा विरोध असणे साहजिक आहे. पण त्यांची जमीन बळजबरीने घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करून आणि योग्य तो मार्ग काढूनच जमिनीचे अधिग्रहण केले जाईल. मुख्यमंत्र्यांची तशी भूमिका असल्याचे यावेळी मा.खा.अशोक नेते यांनी स्पष्ट केले.
































