गडचिरोली : पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकांच्या जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी भरती करण्याच्या सरकारच्या आदेशाची आझाद समाज पार्टीच्या वतीने होळी करत धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर आमदार होळी यांना घेराव घालून निवृत्त शिक्षकांचे अर्ज बाद करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
मागास गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. शिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार न देता, शासन ज्यांची कार्यक्षमता कमजोर होते म्हणून 58 वर्षानंतरच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना परत रिक्त पदांवर घेण्याचा जीआर काढते, ही सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा आणि अन्याय नव्हे का? असा सवाल यावेळी करण्यात आला. एका बाजूला मुख्यमंत्री 1500 रुपये देऊन महिलांना लाचारीचे आमिष दाखवितात आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मुलांच्या नोकऱ्या-रोजगार हिसकावून घेतात, हा खरंतर त्या महिलांवर अन्याय आहे. एकीकडे बेरोजगारांचे हाल, दुसरीकडे योजनांवर मोठ्या प्रमाणावर उलाढाल, असा आरोप आझाद समाज पार्टीचे प्रभारी धर्मानंद मेश्राम यांनी केला.
यासंदर्भात पुढील 8 दिवसात गांभिर्याने विचार न केल्यास प्रत्येक तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल व आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, महिला अध्यक्ष तारका जांभुळकर, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री जराते, जंगोरायताड महिला संघटनेच्या अध्यक्ष आरती कोल्हे, विद्या दुगा, मालता पुडो, बीआयएनच्या उज्वला शेंडे, माळी समाज संघटनेचे सुखदेव जेंगठे, लहुजी शक्ती सेनेचे ज्ञानेश्वर पायघन, रिपब्लिकन पक्षाचे विजय देवतळे, आदिवासी विकास परिषदेचे सोनू कुमरे, नयन कुमरे, अंकुश कोकोडे, सुरज कोडापे, आसपाच्या शोभा खोब्रागडे, सचिव प्रकाश बन्सोड, नागसेन खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत पेंदापल्लीवार, कुरखेडा अध्यक्ष सावन चिखराम, आरमोरीचे शुभम पाटील, करुणा खोब्रागडे, संगीता मोटघरे, सविता बांबोळे, प्रतिमा करमे, प्रतीक डांगे, सतीश दुर्गमवार, सुरेश बारसागडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.