गडचिरोली : भाजपने अखेर बहुप्रतिक्षित गडचिरोली मतदार संघातून पक्षाचा उमेदवार जाहीर करताना विद्यमान आमदार डॅा.देवराव होळी यांना डच्चू देत डॅा.मिलिंद नरोटे यांना संधी दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकीटसाठी डॅा.होळी यांनी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. दुसरीकडे काँग्रेसनेही रात्री उशिरा माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे डॅा.नरोटे विरूद्ध पोरेटी असा सामना या मतदार संघात रंगणार आहे.
काँग्रेसकडून मनोहर पोरेटी यांच्यासह युवा नेते आणि माजी खा.मारोतराव कोवासे यांचे पूत्र विश्वजित कोवासे हे तिकिटच्या स्पर्धेत होते. आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही सोबत काम करू असा समंजसपणा या दोघांनी आधीच बोलून दाखविला होता. ग्रामीण भागात असलेला जनसंपर्क आणि नम्र स्वभावामुळे पोरेटी हे पक्षाच्या दृष्टिने सरस ठरले.
डॅा.मिलिंद नरोटे हे वैद्यकीय व्यवसायाला बाजुला सारत जवळपास वर्षभरापूर्वी भाजपमध्ये सक्रिय झाले. तत्पूर्वी स्पंदन फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक काम सुरू होते. राजकारणात नवीन असल्याने फ्रेश चेहरा म्हणून आणि सामाजिक पार्श्वभूमी पाहून भाजपने त्यांच्यावर डाव लावला आहे.
डॅा.होळी उमेदवारी मागे घेणार?
डॅा.होळी यांनी 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुका भाजपच्या तिकीटवर जिंकल्या आहेत. मात्र मधल्या काळातील त्यांची वागणूक, व्यवहार आणि गटबाजीमुळे त्यांच्याबद्दल पक्षातून नाराजीचा सूर उमटत होता. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. याची दखल घेत भाजप श्रेष्ठींनी त्यांना तिसऱ्यांदा संधी नाकारली. मात्र जिंकण्याची क्षमता माझ्यातच आहे आणि महायुतीमधील इतर पक्षांचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत हे दाखविण्यासाठी त्यांनी शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला. परंतू प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारीची अधिकृतपणे घोषणा होईपर्यंत कोणीही अर्ज दाखल करू नये असे सूचित केले असताना त्याकडे दुर्लक्ष करत डॅा.होळी यांनी वाजतगाजत नामांकन भरणे पक्षाला आवडले नाही. अखेर त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा शेवटपर्यंत विश्वास व्यक्त करताना डॅा.होळी यांनी आपण पक्षाचा आदेश पाळू, असे सांगितले होते. त्यातून तिकीट नाकारल्यास बंडखोरी न करण्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले. आता डॅा.होळी माजी खा.नेते यांच्याप्रमाणे पक्षकार्यात स्वत:ला वाहून घेणार, की बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.