
गडचिरोली : ‘तुम्हाला जमिनीचे पट्टे देण्यासाठी माझीच सही लागते. तुम्ही प्रणोतीताईला नगराध्यक्षपदी विराजमान करा. तुमचे प्रस्ताव त्यांच्या सहीने आणि आमदारांच्या शिफारसीने माझ्याकडेच येतील. ते प्रस्ताव मंजूर करण्याची जबाबदारी मी घेतो. एवढेच नाही तर गेल्या कित्येक वर्षात जे काम झाले नाही ते प्रॅापर्टी कार्ड देण्याचे कामही माझ्याच खात्यामार्फत केले जाईल,’ अशी ग्वाही देत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोलीकरांना साद घातली. नगर परिषद निवडणुकीसाठी चामोर्शी मार्गावर तयार केलेल्या भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते, जिल्हा निवडणूक प्रभारी आ.बंटी भांगडिया, आ.डॅा.मिलिंद नरोटे, माजी आ.डॅा.देवराव होळी, माजी आ.कृष्णा गजबे, मा.आ.डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अॅड.प्रणोती निंबोरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, प्रदेश सचिव रेखा डोळस आदी पदाधिकारी विराजमान होते.
गडचिरोलीच्या चामोर्शी रोड, बस स्टॉपसमोरील पटांगणावर भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर त्याच ठिकाणी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला ना.बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले,“ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. जाहीरनामा तयार करून झालेली, आणि करणार असलेली कामे सांगण्याची क्षमता फक्त भाजपाकडेच आहे, कारण भाजप जे बोलते ते प्रत्यक्षात साकारते. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्यामुळे अनेक नेते कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता भाजपात प्रवेश करत आहेत,” असे ते म्हणाले.
जिल्हा विकासात अग्रेसर राहील— मा.खा.नेते
माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना, केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असल्याने नगर परिषद भाजपच्या ताब्यात आल्यास अनेक मोठी विकासकामे वेगाने पूर्ण होतील. जर गडचिरोलीचा सर्वांगीण विकास हवा असेल, तर नगराध्यक्षपदावर प्रणोती निंबोरकर आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध- निंबोरकर
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अॅड.प्रणोती सागर निंबोरकर यांनी गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. गेल्या कार्यकाळात शहरात बरीच कामे झाली आहेत. अजून बरीच कामे करायची आहेत. त्यासाठी आपल्याला मतांच्या रूपाने आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले.
युवक काँग्रेस पदाधिकाऱ्पांचा पक्षप्रवेश

यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यात युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, काँग्रेसचे जिल्हा महासचिव आकाश बघेल, विनोद भोयर, भगवान चिडंगे तसेच अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. या सर्वांनी भाजपचे दुपट्टे स्वीकारत पक्षप्रवेश केला.
































