भाजपच्या प्रचारात उमेदवारांसह माजी नगराध्यक्षाचे ‘हम साथ-साथ’

आ.डॅा.मिलिंद नरोटे आघाडीवर

गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे पाच दिवस उरले असताना भाजपचे नगरसेवकपदाचे उमेदवार आपआपला परिसर पिंजून काढत आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर नवख्या असल्यामुळे त्यांना विशेष मेहनत घ्यावी लागत आहे. यासोबतच आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या आमदारकीच्या कार्यकाळातील ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे उमेदवारांसोबत ते सुद्धा शहराच्या प्रत्येक भागात जाऊन आपल्या उमेदवारांसाठी मते मागण्यात आघाडीवर आहेत.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतलेल्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे प्रभाग 3 मधून नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत. मंगळवारी इंदिरानगर भागात आ.डॅा.मिलिंद नरोटे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी उपनगराध्यक्ष अनिल कुनघाडकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद पिपरे आदींनी एकत्रित फिरून ‘हम साथ-साथ है’चा संदेश दिला.

‘माझ्या कार्यकाळातील ही पहिली निवडणूक असल्याने आम्ही सर्वस्व पणाला लावत प्रत्येक घरी पोहोचत आहे. भाजपसाठी सकारात्मक वातावरण आहे,’ असे आ.डॅा.नरोटे म्हणाले. ‘आपल्या 5 वर्षाच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात भरपूर कामे झाली, पुढेही ती होत राहील’ असा विश्वास माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी व्यक्त केला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर म्हणाल्या की, माझा परिवार राजकारणात नसला तरी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. माझी जन्मभूमि आणि कर्मभूमि हीच आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मी चांगले काम करून दाखवेन, अशी ग्वाही त्या देतात.

माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद पिपरे म्हणाले, इंदिरानगर वसविण्यात भारतीय जनता पक्षाची भूमिका महत्वाची आहे. 2001 पासून मी नगरसेवक असताना या भागातील रस्ते, नाल्या, शाळा, पाण्याची टाकी अशा सुविधा दिल्या. वनकायद्यामुळे पट्ट्यांची कामे प्रलंबित आहेत. पण गावठाण सर्व्हे झाला की ते कामही मार्गी लागेल, असे आश्वासन ते देतात. माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांनी आपण सदैव नागरिकांसाठी उपलब्ध असतो, त्यामुळे जनतेचा आपल्यावर विश्वास आहे, तो यावेळीही कायम राहील, असे सांगितले.