आरमोरी : तालुक्यातील देऊळगाव येथे 13 नोव्हेंबर रोजी दुर्गामातेच्या दर्शनाने आ.कृष्णा गजबे यांच्या प्रचाराला सुरूवात झाली. विधानसभा निवडणूक प्रमुख तथा ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार आणि आमदार गजबे यांनी देलोडा, वडधा यासह इतर गावांमध्ये प्रचारादरम्यान गावसभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांसह गावातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत नेत्यांना पाठिंबा देत नवी ऊर्जा दिली.
देऊळगावच्या भेटीत विधानसभा प्रभारी श्रीनिवासजी, भाजपचे जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, मनोहर सुंदरकर, सौरभ सुंदरकर, पंकज जांभुळे, जगदीश ढोक, मोहन पत्रे, पंकज पुरेलीवार, संतोष बनकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक हजर होते.
यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी ग्रामविकासाच्या दृष्टीने भविष्यातील योजनांची माहिती देऊन येणाऱ्या काळात साथ देण्याची विनंती केली. प्रकाश पोरेड्डीवार यांनीही प्रभावी भाषण करत गावकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची आणि त्यांच्यासाठी विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
ठिकठिकाणी झाले स्वागत
सुवर्णनगर येथे आ.गजबे आणि प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचे आगमन होताच फटाके फोडून आणि गावातल्या मुख्य रस्त्याने रॅली काढून जयघोष करत स्वागत करण्यात आले. वडधा येथे शिवमंदिरात दर्शन घेऊन उत्साहाच्या वातावरणात सभा झाली. देलोडा येथे गावकऱ्यांनी एकजुटीने आ.गजबे यांच्या बाजुने उभे राहात विजयाचा विश्वास दिला. सावलखेडा येथेही अशीच स्थिती होती.