गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील महायुती आणि महाविकास आघाडीमधील उमेदवारीची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. महायुतीत ही जागा कोणी लढायची हे जवळजवळ निश्चित झाल्याचे बोलले जाते. तसे संकेतही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीमधील घटक पक्षांना दिले आहेत. पण इतर काही मतदार संघांमधील पेच सुटायचा असल्याने गडचिरोली-चिमूर मतदार संघातील अधिकृत उमेदवारी जाहीर करण्याचे टाळले जात आहे.

दरम्यान वरिष्ठ स्तरावरील हालचाली पाहता भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मंगळवारी खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी जमलेल्या मतदार संघांमधील बहुतांश भाजप तालुकाध्यक्ष आणि इतर काही पदाधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा केली. गेल्या 10 वर्षापासून आणि त्यापूर्वीही अनेक वेळा या मतदार संघावर भाजपचे वर्चस्व राहिले असल्याने यावेळीही या मतदार संघात मित्रपक्षाएेवजी भाजपलाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॅा.श्याम हस्वादे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश भारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, डॅा.भारत खटी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, लता पुनघाटे, विनोद आकमपल्लीवार, रंजिता कोडापे यांच्यासह इतर पदाधिकारी, तालुकाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.
 
            
