विदर्भ संघटनमंत्री कोठेकर यांनी करून दिली जबाबदारीची जाणीव

भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्हा बैठक

देसाईगंज : गडचिरोली जिल्हा भाजपची बैठक देसाईगंज येथे विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी खासदार डॉ.अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी कोठेकर यांनी पदाधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देत मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ.कोठेकर म्हणाले, पद हे कायमस्वरूपी नसते, पण त्या पदावर असताना त्याचा योग्य उपयोग करून दिलेल्या जबाबदारीसाठी वेळ देणे, पक्षाच्या कामाला प्राधान्य देणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे. बुथ, शक्ती केंद्र प्रमुख, मंडळ, प्रदेश ते राष्ट्रीय स्तरावर पक्षाची रचना मजबूत आहे. वेळोवेळी मिळणारे पद हे सन्मानाचे असून, त्या जबाबदारीचे कार्यकर्त्यांनी न्यायाने पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय पक्षाने दिलेले विविध कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन डॅा.उपेंद्र कोठेकर यांनी केले.

या जिल्हा बैठकीला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, तालुका व मंडळ पदाधिकारी आणि आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालन जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी केले.