गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे जिल्हा महामंत्री, युवा आणि ओबीसी चेहरा असलेले प्रशांत वाघरे यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्यावर्षी काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदी युवा पदाधिकाऱ्यासह ओबीसी चेहऱ्याला जिल्हाध्यक्षपदी विराजमान केल्यानंतर भाजपनेही युवा चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे युवा पिढीला आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.
भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना होती. नागदेवे यांना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे प्रमुख म्हणून जबाबदारी दिल्यानंतर जिल्हाध्यक्षपदासाठी हालचालींना वेग आला.
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात लोकसभेसह सर्व विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामुळे जवळपास तेवढ्याच संख्येत असलेल्या ओबीसी समाजाला किमान संघटनेत प्रतिनिधीत्व मिळावे असा सर्वसाधारण सूर उमटत होता. दरम्यान पक्षाने ओबीसीसोबत युवा चेहऱ्याला संधी देण्याचे ठरवत प्रशांत वाघरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.