देसाईगंज : जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन 6 एप्रिल रोजी येथील भाजप कार्यालयात मा.आ.कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महिला जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाने साजरा झाला.
‘प्रथम देश, नंतर पक्ष, शेवटी स्वत:’ हे ब्रिद मनाशी ठेऊन मार्गक्रमण करणाऱ्या भाजप परिवारातील सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि पक्षावर मनापासून प्रेम करणाऱ्या जनतेला शुभेच्छा देतो. एक छोटा पक्ष म्हणून सुरुवात करत जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षापर्यंतचा प्रवास अविस्मरणीय आहे. राष्ट्रसेवा, समाजसेवा व धर्मरक्षा या पक्षाच्या तत्वांसाठी आयुष्य समर्पित केलेल्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, अशी भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी पक्षध्वजाला वंदन करत, पक्षाच्या मूल्यांना वचनबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला.
संघटन पर्वात महाराष्ट्र भाजपाचे 1 कोटी 51 लाख सदस्य झाले. या अभूतपूर्व यशाचा जल्लोष आणि पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांचे भाषण लाईव्ह ऐकण्याची सुविधा करण्यात आली होती.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कूकरेजा, महिला जिल्हा उपाध्यक्ष शालू दंडवते, जिल्हा महामंत्री प्रीती शंभरकर, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, तसेच सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.