देसाईगंज : जिल्ह्यातील पहिली नगर परिषद असलेल्या देसाईगंज नगर परिषदेवर पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या लता मुरलीधर सुंदरकर यांनी काँग्रेसच्या वनिता अशोक नाकतोडे यांचा अवघ्या 616 मतांनी निसटता विजय मिळवला.
एकूण 21 नगरसेवकांपैकी भाजपचे 12, काँग्रेसचे 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) 2 नगरसेवक निवडून आले. भाजपला याही ठिकाणी स्पष्ट बहुमान मिळाले आहे. विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबहुल वातावरण निर्माण झाले असताना देसाईगंज शहराने पुन्हा एकदा भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार रामदास मसराम त्यांच्या मतदार संघातील देसाईगंज आणि आरमोरी या दोन्ही नगर परिषदांमधील काँग्रेसचा पराभव हा त्यांच्यासाठी ‘रेड सिग्नल’ ठरला आहे.
अवघ्या वर्षभरात नागरिकांचा कौल बदलविण्यात भाजपच्या वतीने माजी आमदार कृष्णा गजबे, भाजप नेते किशन नागदेवे, मोतीलाल कुकरेजा, व्यापारी आघाडीचे आकाश अग्रवाल आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. नगरसेवकपदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यापासून तर त्यांना विजयी करण्यापर्यंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश पदरी पडले.
































