मुख्यमंत्र्यांनी केली भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा

​गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी संध्याकाळी गडचिरोलीच्या दौऱ्यावर असताना पोलिसांच्या अतिथीगृहात त्यांनी जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. जिल्ह्यातील तीनही नगर परिषदांमध्ये भाजपने मिळवलेल्या वर्चस्वाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या चर्चेच्या वेळी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी आ.कृष्णा गजबे, मा.आ. डॅा.देवराव होळी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल, देसाईगंज न.प.चे माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा प्रामुख्याने उपस्थित होते. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर (गडचिरोली), रुपेश पुणेकर (आरमोरी) आणि लता सुंदरकर (देसाईगंज), सागर निंबोरकर यांनीही मुख्यमंत्र्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करून चांगला कारभार करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टिने राजकीय वातावरण आणि जिल्ह्यातील घडामोडींवर चर्चा केली.