गडचिरोली : जिल्ह्यातील पहिली नगर परिषद असलेल्या देसाईगंजमध्ये मंगळवारी (दि.20) झालेल्या विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने महायुती कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसला एक सभापतीपद दिले. आज (दि.21) गडचिरोली नगर परिषदेत सभापतीपदाची निवड होणार आहे. त्यात आमदार बंटी भांगडिया यांनी म्हटल्यानुसार महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले जाते, की भाजप ‘एकला चलो रे’चा नारा देत सत्तेची जोखीम पत्करते, याकडे गडचिरोलीकरांच्या नजरा लागल्या आहेत.
देसाईगंज नगर परिषदेत मंगळवारी स्थायी समिती, तसेच विषय समित्यांच्या निवडणुका शांततापूर्ण वातावरणात झाल्या. पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत बांधकाम समिती सभापती म्हणून नरेश विठलानी, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती चेतनदास विधाते, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती म्हणून सचिन खरकाटे, महिला व बालकल्याण समितीवर भाविका साधवानी, शिक्षण समितीवर सभापती म्हणून बाळकृष्ण माडुरवार, नियोजन समितीचे सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंकू बावणे, आणि स्थायी समिती सभापती म्हणून नगराध्यक्ष लता सुंदरकर यांची निवड करण्यात आली.
गडचिरोलीत असा असेल निवडणूक कार्यक्रम
गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी कळविल्यानुसार, आज सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत स्थायी समितीसह विषय समित्यांची सदस्यसंख्या अवगत करून नगर परिषद उपाध्यक्षांकडे कोणत्या समितीचे सभापतीपद राहील हे ठरविले जाईल. तसेच विषय समितीच्या सदस्यांचे नामनिर्देशन केले जाईल.
सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत सभापतीपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले जाईल. दुपारी 1 वाजता पिठासीन अधिकारी सभेची सुरूवात करतील. त्यानंतर आलेल्या नामनिर्देशनांची छाननी केली जाईल. वैध ठरलेल्या नामनिर्देशांची नावे वाचून दाखविली जातील. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनीटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढू इच्छिणारे एकापेक्षा अधिक असल्यास विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाईल आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पिठासीन अधिकारी निकाल घोषित करतील. त्याचप्रमाणे स्थायी समितीचेही गठण केले जाईल.
भाजपमधील अंतर्गत संघर्षाचा परिणाम?
आरमोरी नगर परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने त्यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे सर्व सभापतीपदांवर भाजपच्या नगरसेवकांना बिनविरोधपणे संधी मिळाली. मात्र गडचिरोलीत भाजपला काठावर बहुमत आहे. अशा स्थितीत जोखीम नको, म्हणूनच जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आमदार बंटी भांगडिया यांनी स्वीकृत सदस्यांच्या निवडीप्रसंगी माध्यमांशी बोलताना आम्ही महायुतीमधील घटक पक्षांना सोबत घेऊनच सत्तेत बसू, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता लिलाधर भरडकर यांना एक सभापतीपद देण्यासाठी काही पदाधिकारी अनुकूल आहेत. मात्र काही पदाधिकाऱ्यांचा याला विरोध आहे. यावर भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोणता संदेश देण्यात आला यावरच राष्ट्रवादीला सोबत घेणे-न घेणे यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने दूर सारल्यास काँग्रेसकडून मैत्रीचा हात पुढे केला जाण्याची शक्यता असल्याचेही बोलले जाते. अशा स्थितीत भाजपकडून कोणता तोडगा काढल्या जातो, याकडे गडचिरोलीकरांच्या नजरा लागल्या आहेत.
































