गडचिरोली : एकीकडे मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाचे वातावरण पेटले असताना आता भाजपने ओबीसी समाजावर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात चार टप्प्यांमध्ये ओबीसी जागर यात्रा काढल्या जाणार असून त्यातील पहिला टप्पा विदर्भात होणार आहे. सोमवारी (दि.२) वर्धा जिल्ह्यातील नगाजी महाराज देवस्थानातून प्रारंभ झालेली ही यात्रा बुधवार दि.४ ला गडचिरोलीत येणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात निघणाऱ्या या यात्रेचे नेतृत्व माजी आमदार डॅा.आशिष देशमुख आणि भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय गाथे करणार आहेत. यात्रेचा समारोप वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे विदर्भातील सर्व खासदार-आमदारांच्या उपस्थितीत होणार आहे.
गडचिरोलीत सकाळी या यात्रेच्या माध्यमातून शहराच्या काही भागात घर चलो अभियान राबविले जाणार आहे. ही यात्रा चंद्रपूर मार्गाने इंदिरा गांधी चौकातून आरमोरी मार्गावरील सभागृहात ओबीसी जागर मेळाव्यात रुपांतरित होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी सांगितले.
यावेळी विश्वकर्मा योजनेबद्दलही माहिती सांगण्यात आली. पत्रपरिषदेला आ.डॅा.देवराव होळी, लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, महिला प्रदेश सचिव रेखा डोळ, जिल्हा महामंत्री माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.