भाजपने नगर परिषदेचा गड राखला, तीनही ठिकाणी वर्चस्व

निंबोरकरांना सर्वाधिक मताधिक्य

गुलाल उधळून विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना भाजपचे नेतेमंडळी
भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना काँग्रेसचे पदाधिकारी.

गडचिरोली : तब्बल आठ वर्षानंतर झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा जिल्ह्यातील तीनही नगर परिषदा काबिज करून आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरवलेले तीनही उमेदवार नवखे होते. पण पक्षाची ताकत त्यांच्या पाठीशी उभी करून भाजपने प्रतिष्ठेच्या या राजकीय लढाईत विजय मिळवला. गडचिरोलीत अॅड.प्रणोती सागर निंबोरकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अश्विनी रविंद्र नैताम यांचा 4839 मतांनी पराभव करत नगर परिषदेच्या राजकारणात प्रवेश केला. त्या सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आणि नगराध्यक्ष म्हणून सर्वात तरुण उमेदवार ठरल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या कविता सुरेश पोरेड्डीवार यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

गडचिरोली नगर परिषदेच्या 27 नगरसेवकांपैकी भाजपला 15, काँग्रेसला 6, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 5, तर वंचित बहुजन आघाडीला 1 जागा मिळाली आहे.

गडचिरोलीकरांनी दिलेले हे प्रेम सार्थकी लावणार, आणि आपल्या पदाचा उपयोग विकास कामांसाठी आणि गडचिरोलीकरांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे करणार, अशी प्रतिक्रिया प्रणोती निंबोरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

या विजयानंतर पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) तथा माजी खासदार अशोक नेते, आ.डॅा.मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे अशा ज्येष्ठ नेत्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यानंतर सर्वांनी विजयी जल्लोष केला.

या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे त्यांनी गडचिरोलीत भाजपच्या तीनही नगर परिषदांमधील उमेदवारांच्या विजयासाठी जाहीर सभा घेतली होती. याशिवाय स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही भाजपच्या उमेदवारांसाठी मोठी मेहनत घेतली. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांना अखेर यश आले. विशेष म्हणजे तीनही नगर परिषदांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडाही गाठला आहे. आता मैत्रीपूर्ण लढतीनंतरही महायुती कायम राहिल, असे मुख्यमंत्र्‍यांनी निवडणुकीदरम्यान म्हटल्याप्रमाणे महायुती म्हणून भाजप मित्रपक्षांना सत्तेत वाटेकरी करणार, की भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार, याची उत्सुकता मात्र कायम आहे.