गडचिरोली : आरमोरी विधानसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा भाजपने आ.कृष्णा गजबे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. सोमवार, दि.28 रोजी ते नामांकन दाखल करणार आहेत. यावेळी मतदार संघातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते देसाईगंजमध्ये दाखल होणार आहेत.
देसाईगंजसह आरमोरी, कुरखेडा आणि कोरची हे कार्यक्षेत्र असलेल्या या विधानसभा मतदार संघात प्रत्येक तालुका मुख्यालयी आ.गजबे यांचे प्रचार कार्यालय राहणार आहे. शनिवारी कुरखेडा येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी हजेरी लावून आ.गजबे यांना हॅटट्रिक करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान यावेळी काँग्रेसकडून ईच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली असली तरी पक्ष कोणाला उमेदवारी देते हे अद्याप निश्चित झालेले नाही. काँग्रेसला अद्याप योग्य उमेदवार ठरवता आला नाही, की बंडखोरी टाळण्यासाठी मुद्दाम उशिर केला जात आहे, अशी चर्चा या क्षेत्रात सुरू आहे.