आजपासून भाजपचे लोकसभा क्षेत्रात महाजनसंपर्क अभियान

केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा जागर, सर्व समाजघटकांना आकर्षित करणार

गडचिरोली : केंद्रात सत्तेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने ९ वर्ष पूर्ण केली आहेत. या काळात सरकारने घेतलेले निर्णय, राबविलेल्या योजनांचा जागर करण्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात दि.३० मे पासून महाजनसंपर्क अभियान राबविले जाणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.

३० मे ते ३० जून या महिनाभराच्या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या या अभियानादरम्यान केंद्रीय मंत्रीही जिल्ह्यात येऊन सभा घेणार आहेत. या अभियानात काँग्रेसच्या कार्यकाळात झालेली कामे आणि भाजप सरकारच्या कार्यकाळातील कामांचा तुलनात्मक आलेख नागरिकांसमोर मांडला जाणार आहे. याशिवाय विविध संमेलनांच्या माध्यमातून योजनांचे लाभार्थी, व्यापारी, बुद्धिजीवी वर्ग, तसेच आदिवासी, ओबीसी, युवा वर्ग, महिला वर्ग यांना भाजप सरकारची कामे सांगितली जाणार आहेत.

आमच्या काळात डिजिटल इंडियामुळे भ्रष्टाचार रोखण्यात यश आले असून गडचिरोली जिल्ह्यात साडेचौदा हजार कोटींची विकास कामे करण्यात आली आहेत. विविध सिंचन प्रकल्प मार्गी लाावण्यासोबत पूल आणि महामार्गांची कामे झाली आहेत. मार्कंडेश्वर देवस्थानातील कामांसाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले असल्याचेही यावेळी खा.नेते यांनी सांगितले. यावेळी आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, प्रशांत वाघरे, रमेश भुरसे, रेखा डोळस यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आज भाजपा पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक
महाजनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि.३० मे रोजी दुपारी १२.३० वाजता चंद्रपूर मार्गावरील हॉटेल लॅन्डमार्क येथे भाजप पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यात विदर्भ प्रांत संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, खासदार अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्व विद्यमान व माजी आमदार, तीनही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा महामंत्री, प्रदेश कार्यकारीणी सदस्य, कायम निमंत्रित सदस्य, सर्व जिल्हा आघाडी अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष, महामंत्री आणि २० तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे भाजपकडून कळविण्यात आले.