भाजपने घेतले सोशल मिडियातील प्रभावशाली व्यक्तींचे संमेलन

सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - खा.अशोक नेते

सोशल मिडियात प्रभावशाली काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करताना खासदार अशोक नेते, सोबत आ.डॅा.होळी, बाबुराव कोहळे

गडचिरोली : मोदी @ 9 या महाजनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर (प्रभावशाली व्यक्ती) संमेलन येथील प्रेस क्लब भवनात रविवारी (दि.९) आयोजित करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळातील कामे जनतेपर्यंत पोहचविण्याकरीता सोशल मिडिया प्रमुख हे महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीचे उद्घाटक म्हणून खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते होते. मिडिया प्रमुखांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सोशल मिडिया एक विशाल नेटवर्क आहे. या नेटवर्कला अॅक्टिव्ह करण्यासाठी व्हॅाट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि बरेच माध्यमं आहेत. आजच्या काळात कमीत कमी वेळात घरबसल्या सर्व घडामोडींच्या बातम्या सोशल मिडियाद्वारे, ऑनलाइन नेटवर्कच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात सोशल मिडिया हे एक महत्वाचे माध्यम झाले आहे. त्यामुळे होणारे कार्यक्रम आणि झालेले कार्यक्रम सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी जागरूक असावे. व्हॅाट्सअॅपद्वारे जर कोणी व्यक्ती आपल्या शासनाच्या विरोधात कॉमेंट करत असेल तर त्या कॅामेंटला उत्तर देण्याचे काम सोशल मिडियाच्या माध्यमातून लगेच केले पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यातही सोशल मिडियाची महत्वाची भूमिका असल्याचे खा.नेते म्हणाले.

अर्थव्यवस्थेमध्ये आपला भारत देश आधी जगात अकराव्या स्थानी होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे. देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी अनेक नवीन योजना अंमलात आणुन त्या तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचवित, लोकाभिमुख कार्य केले. या सर्व चांगल्या गोष्टी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.

यावेळी मंचावर आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, भाजपा सोशल मीडियाचे प्रदेश संयोजक प्रकाश गाडे, सहसंयोजक लक्की चावला, प्रदेश सदस्य तथा चंद्रपूर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, प्रदेश चिटणीस रेखा डोळस, माजी.जि.प.सदस्य तथा धानोरा तालुकाध्यक्ष लता पुंगाटी, सोशल मिडिया प्रमुख तथा कार्यक्रमाचे आयोजक आनंद खजांजी, खासदारांचे सोशल मिडिया प्रमुख दिवाकर गेडाम, मिडिया प्रमुख रमेश अधिकारी तसेच मोठ्या संख्येने लोकसभा क्षेत्रातील सोशल मिडिया हाताळणारे युवक-युवती उपस्थित होते.