गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाची संवाद बैठक भाजपच्या चामोर्शी मार्गावरील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यात भाजप सरकारनेच ओबीसी समाजाच्या सर्वांगिन विकासासाठी पावलं उचलली आहेत. ओबीसी समाजाच्या मागण्या, समस्या आणि अपेक्षांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. त्यामुळे ओबीसी समाज भाजपच्या पाठिशी ठामपणा उभा राहिल, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खा.अशोक नेते यांनी व्यक्त केला.
या बैठकीला ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी संगमलाल गुप्ता, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सदस्य प्रकाश बगमारे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, ओबीसी नेते भास्कर बुरे, तसेच मोठ्या संख्येने ओबीसी महिला व बांधव उपस्थित होते.
यावेळी मा.खा.नेते म्हणाले, भाजप सरकारच्या कार्यकाळातच ओबीसी समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली. ओबीसी आयोग व मंत्रालयाची स्थापना याच कार्यकाळात करण्यात आली. याशिवाय विविध योजनाही राबविल्या जात असल्याचे ते म्हणाले. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासात सरकारचे मोठे योगदान असल्यानेच हा समाज भाजपच्या पाठिशी खंबीरपणे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.