आरमोरीत सावकारांचे प्राबल्य, नवख्या पुणेकरांचा सहज विजय

सलग दुसऱ्यांदा मिळवली सत्ता

आरमोरी : आरमोगी नगर परिषद निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. रुपेश प्रकाश पुणेकर या नवख्या तरुणाला निवडणूक रिंगणात उतरवून नगराध्यक्षपदी विराजमान करण्यात सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी किंगमेकरच्या भूमिकेतून घेतलेली मेहनत महत्वाची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जयकुमार मेश्राम यांचा पुणेकर यांनी 1904 मतांनी पराभव केला. काँग्रेस उमेदवाराला या ठिकाणी तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.

आरमोरीत एकूण 20 नगरसेवकांपैकी भाजपला 15, काँग्रेसला 4 आणि शिवसेना (शिंदे) यांना 1 जागा मिळाली आहे.

आरमोरीला ग्रामपंचायत मधून नगर परिषदमध्ये रुपांतरित करण्यात ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची भूमिका महत्वाची होती. आरमोरी नगर परिषद निर्मितीचे ते शिल्पकार ठरले होते. त्यानंतरच्या 2018 मधील पहिल्या निवडणुकीत आरमोरी नगर परिषदेवर भाजपची सत्ताही त्यांनी बसवली. कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकराज होते, पण पुन्हा यावेळी सावकारांच्या मार्गदर्शनात या नगर परिषदेवर भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनीही आरमोरीतील विजयासाठी सभा घेतल्या. विधानसभेतील पराभवानंतर पुन्हा मतदारांना भाजपच्या बाजुने वळविणे त्यांच्यासाठी महत्वाचे होते. त्यामुळे त्यांनाही दिलासा मिळाला आहे. या विजयानंतर संध्याकाळी आरमोरी शहरातून काढलेल्या विजयी मिरवणुकीत प्रकाश सावकार पोरेड्डीवार, मा.आ.कृष्णा गजबे हे सहभागी झाले होते.