अहेरी : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर शनिवारी संध्याकाळी प्रथमच त्यांचे राजनगरी अहेरीत आगमन झाले. याचा आनंद साजरा करीत अहेरीकर नागरिक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे खुल्या जीपवरून मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत केले. तत्पूर्वी मार्गावरील अनेक गावातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
7 जुलै रोजी ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाले. 8 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी अहेरीकडे आगेकुच केली. सायंकाळच्या सुमारास चामोर्शी, आष्टी, मुलचेरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी मिरवणूक काढत त्यांचे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले.
आलापल्ली येथे आगमन होताच मुख्य चौकातून भव्य मिरवणूक काढून ढोलताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर नाचत आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. नागेपल्ली येथेही मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. रात्री 10 वाजताच्या सुमारास ते अहेरी मुख्यालयात पोहोचले. यावेळी दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गांधी चौक येथे आयोजित सभेला त्यांनी संबोधित केले.
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या रूपाने गडचिरोली जिल्ह्याला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने अहेरी येथील राजनगरीत चांगलाच उत्साह संचारल्याचे दिसत होते. विविध संघटना तसेच विविध समाजाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
कुटुंबियांकडून मंत्रौच्चारासह औक्षवण
अहेरी येथील गांधी चौकात आयोजित सभेला संबोधित केल्यावर धर्मरावबाबा हे आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले. राजवाडा परिसरात त्यांचे आगमन होताच घरच्या सदस्यांनी मंत्रोच्चार करत फुलांचा वर्षाव करून त्यांचे औक्षवण केले. यावेळी केक कापून सर्वांचे तोंड गोड करत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, डॉ.सौ.मिताली आत्राम, रामेश्वरबाबा आत्राम, जे.डी. सडमेक तसेच राज परिवारातील सदस्य उपस्थित होते.