गडचिरोली : येणाऱ्या नगर परिषद निवडणुका संयुक्तरित्या लढविण्याबाबत शहरातील सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांनी केलेला निर्धार आता एक पाऊल पुढे सरकलेला आहे. या सर्व पक्षांनी मिळून नगर विकास आघाडीची स्थापना केली आहे.

येथील चांदेकर भवनात झालेल्या या पक्ष, संघटनांच्या कोअर कमिटीच्या पहिल्याच बैठकीत सदर आघाडीची घोषणा करण्यात आली. निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुध्दा यावेळी जाहीर करण्यात आली.
उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते डॉ.मारोतराव रायपुरे होते. समितीचे नियंत्रक रोहिदास राऊत, बसपा जिल्हाध्यक्ष भास्कर मेश्राम, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे, अ.भा.रिपब्लिकन पक्षाचे हंसराज उंदिरवाडे, आझाद समाज पार्टीचे राज बन्सोड, बीआरएसपीचे मिलिंद बांबोळे, भारत मुक्ती पार्टीचे प्रमोद राऊत, भारतीय बौध्द महासभेचे प्रा.गौतम डांगे, बुध्दीष्ठ सोसायटी ऑफ इंडीयाचे धर्मानंद मेश्राम यांच्यासह कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
गडचिरोली शहरात आंबेडकरी पक्षांचे ऐक्य निर्माण झाल्याच्या आनंद सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. हे ऐक्य कोणत्याही परिस्थितील कायम राहील, याची ग्वाही सुध्दा सर्वांनी दिली. यावेळी आंबेडकरी ऐक्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न हाणुन पाडू व एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाऊ, असेही कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले.
 
            
