गडचिरोली : गडचिरोलीचे पालकमंत्री असतानापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीबद्दल निर्माण झालेले प्रेम आजही कायम असल्याचे दिसून आले. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिपली बुर्गी येथे आयोजित पोलिस विभागाच्या जनजागरण मेळाव्यात त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे) वतीने शिधाआटा असलेल्या किट आणि भेटवस्तूंचे वाटप केले. जनजागरण मेळाव्याला उपस्थित आदिवासी नागरिकांसह महिला पोलिस कर्मचाऱ्यांनाही ही भाऊबिजेची भेट मिळाली.
यावेळी पिपली बुर्गी येथे उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकिय इमारतीचे भूमीपूजन, पोलिस अंमलदार बॅरेक आणि अधिकारी विश्रामगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पोलिस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी करुन महाजनजागरण मेळाव्यास उपस्थित नागरिकांना धोतर, साड्या, मच्छरदानी, ब्लॅकेट, स्प्रे-पंप, फास्टफुड किट, लोणचे पापड किट व इतर जीवनावश्यक भेटवस्तू व साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, नोटबुक, कंपास बॉक्स, बिस्किट पॉकेट, चॉकलेट्स, व्हॉलीबॉल नेट व बॉल, क्रिकेट साहित्य (बॅट, स्टम्प्स, बेल्स व बॉल) इत्यादी साहित्यांचे वाटप करून आदिवासी बांधवांसोबत तसेच माओवादग्रस्त अतीदुर्गम भागात कार्यरत पोलिस जवानांसोबत दिवाळी साजरी केली. भाऊबीज सणाचे औचित्य साधून पोस्टे मधील महिला पोलिस अंमलदार व स्थानिक महिलांनी मुख्यमंत्र्यांना ओवाळणी घातली.
येथील विशेष अभियान पथकाची टिम अतिशय सक्षम आहे. केंद्रीय मंत्री देखील गडचिरोली पोलीस दलाचे नाव घेतात, अशा शब्दात त्यांनी गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक केले. यासोबतच गडचिरोली पोलिस दलाच्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. यातून गडचिरोली जिल्ह्रातील आदिवासी बांधवांचा विकास होण्यास मदत होत असल्याचे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.
कार्यक्रमाला गडचिरोलीचे परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (अहेरी) वैभव वाघमारे, केंद्रीय राखीव बल 192 बटालियचे कमांडंट परविंदर सिंह, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, एटापल्लीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव उपस्थित होते.