सरन्यायाधिशांवरील हल्ल्याचा गडचिरोली आणि अहेरीत निषेध

आरोपीला निलंबित करण्याची मागणी

निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन देताना रिपांइंचे पदाधिकारी

गडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सुरु असताना वकिल राकेश किशोर यांनी सरन्यायाधिश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून भ्याड हल्ला केला. या घटनेचा गडचिरोलीसह अहेरीत निषेध करण्यात आला. हा लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. असे निंदनिय कृत्त्य करणाऱ्या वकिलास अटक करून निलंबित करावे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाही, असे निवेदन रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठविण्यात आले.

निवेदन देताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर, बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर, आरपीआय चंद्रपूरचे गोपाल रायपूरे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे, मारोती भैसारे, नाजूक भैसारे, लहुकुमार भैसारे, सुखदेव वासनिक, हेमंत बारसागडे, बामसेफचे प्रमोद राऊत, डोमाजी गेडाम, माजी नगरसेवक तुळशिराम सहारे, रोशन उके, जीवन मेश्राम, दामोधर शेंडे, सुमन उंदिरवाडे, प्रेमिला नान्होरीकर, लता भैसारे, प्रेमलता कान्हेकर, अनुपमा फुलझेले, निलम दुधे, अमिता भैसारे, कांता भडके, दर्शना वनीकर, लिला वाकडे, नलिनी उंदिरवाडे, पद्मा गजभिये, मुक्ता कोसेकर, करुणा भसारकर, जासुंदा शिंपी यांच्यासह रिपाइं-बामसेफचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कठोर शिक्षा करा- अलोणे

सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर सोमवारी (दि. 6) राकेश किशोर नामक वकिलाने बूट भिरकावण्याचा प्रकार निंदनीय असून अशा जातीयवादी, समाजकंटकाला कठोर शिक्षा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. देशात लोकशाही व सर्वधर्मसमभावाची झालर असताना असे संतापजनक प्रकार तेही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर झाल्याने हे अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. या घटनेनंतर सरन्यायाधीश भुषण गवई यांनी संयम कायम ठेवला असला तरी, भावना दुःखावल्या असून समाजकंटक वकील राकेश किशोर यांना शिक्षा करून त्यांचे लायसन्स बडतर्फ करावे, अशीही मागणी सुरेंद्र अलोणे यांनी केली आहे.