गडचिरोली : राज्याचे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांच्याकडून जिल्ह्यातील विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत काँग्रेसच्या वतीने गुरूवारी गडचिरोलीत डफरी बजाव आंदोलन करत पालकमंत्र्यांना साद घालण्यात आली.
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील फडणवीस यांनी गडचिरोलीसारख्या मागास आणि दुर्गम जिल्ह्याचे पालकत्व स्वत:हून स्वीकारले, मात्र आता विविध समस्यांनी जिल्ह्यातील नागरिक त्रस्त असताना ते जिल्ह्यात येत नाही. त्यांच्याकडे ऊर्जा खाते असताना देखील शेतीला नियमित वीज पुरवठा मिळत नाही, रानटी हत्ती आणि वाघाच्या धुमाकुळामुळे शेतकरी त्रस्त आहेत, प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याचे मालक असल्याप्रमाणे वागत आहेत, असे असताना मागील अनेक महिन्यांपासून फडणवीस यांनी जिल्ह्यात दौरा केलेला नाही. त्यामुळे काही दिवसाआधी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्र लिहून पालकमंत्र्यांनी किमान जिल्ह्यात दिवाळीच्या फराळासाठी तरी यावे असे निमंत्रण दिले होते. मात्र पालकमंत्र्याच्या दौऱ्याची अजूनही काही चाहूल न लागल्याने जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘पालकमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्यात या, जबाबदारी झेपत नसेल तर राजीनामा द्या’, असे म्हणत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौकात डफरी बजाव आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.