गडचिरोली : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावून अनेक ठिकाणी पात्र कोरडे पडत आहे. त्यामुळे शेतातील पिकं आणि पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी गोसेखुर्द धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी करत शनिवारी काँग्रेसच्या वतीने वैनगंगा नदीच्या गडचिरोली-मूल मार्गावरील पुलाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. सोमवारपर्यंत पाणी सोडा, अन्यथा मंगळवारी आमच्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांना घेराव करून धडा शिकवू, असा इशारा काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने लगतच्या शेतातील पिकांना पाणी घेणे अडचणीचे झाले आहे. यासोबतच नदीकाठावरील गावातील भूजल पातळीही कमी होऊन गावकऱ्यांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे पाळीव प्राणी, जंगली जनावरे यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत करून ही समस्या करा, या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील इतर मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात नदीपात्रात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून लवकरात लवकर नदीपात्रात पाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे कळविले. यावेळी जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे यांनी पाणी न सोडल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वजित कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, प्रमोद भगत, राजेंद्र बुल्ले, जिल्हा काँग्रेसचे नेते शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, वामनराव सासाकडे, दामदेव मंडलवार, अनिल कोठारे, दिलीप घोडाम यांच्यासह इतर पदाधिकारी आणि गावकरी सहभागी झाले होते.