केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आज गडचिरोलीत निषेध आंदोलन

राष्ट्रीय नेत्यांवर दबावतंत्राचा वापर

गडचिरोली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी विविध आरोप लावून त्यांना सतत नोटीस दिल्या जात आहे, असा आरोप करत काँग्रेसकडून या प्रकाराचा आज जाहीर निषेध केला जाणार आहे. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे निषेध आंदोलन केले जाणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते देशातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, युवक व इतर शोषितांच्या समस्यांना घेऊन लोकसभेत व सार्वजनिक ठिकाणी सतत आवाज उठवित आहेत. त्यामुळे केंद्रातील भाजपशासित मोदी सरकारकडून राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यावर विविध आरोप लावून पाठविल्या जात असलेल्या नोटीस म्हणजे लोकशाहीविरोधी कृत्य आहे. त्यामुळे त्याचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी कळविले. जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेलचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.