गडचिरोली : काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कविता पोरेड्डीवार शहराच्या प्रत्येक प्रभागात फिरून सर्व परिसर पिंजून काढत आहेत. त्यांच्यासोबत शहराचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि नगरसेवक पदाचे उमेदवारही लवाजम्यासह फिरताना दिसतात. मंगळवारी त्यांनी गोकुळनगर, चणकाईनगरच्या भागात पायी फिरताना त्या भागातील नागरिकांना मतांसाठी साद घातली.
सुरेश सावकार पोरेड्डीवार यांनी गडचिरोलीचे शेवटचे सरपंच आणि प्रथम नगराध्यक्ष असे 15 वर्ष शहराचे नेतृत्व केले. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, त्या काळातील निवडणुका आणि आताच्या काळातील निवडणुकांमध्ये भरपूर आहे. आता वेगवेगळे आमिष दाखवून मतदारांना आकर्षित केले जाते. पण आमचा सामाजिक कार्यावर भर असल्याने आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालतो. त्यामुळे शहरवासिय आमच्या पाठीशी राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कविता पोरेड्डीवार म्हणाल्या, राज्यात सर्वाधिक मलेरियाग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोली ओळखल्या जातो. त्यामुळे शहराला यातून बाहेर काढण्यासाठी खुली गटारलाईन बंद करून स्वच्छतेवर भर देऊन नागरिकांचे आरोग्य सुदृढ कसे राहील, याकडे पहिल्यांदा लक्ष देणार असल्याचे त्या म्हणाल्या.
जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भाजपला टार्गेट करत शहरवासियांनी भाजपच्या कार्यकाळातील कारभाराचा अनुभव लोकांनी घेतला, आता त्यांनी जास्तीत जास्त ठेकेदारांना उमेदवारी दिली आहे. त्यांना जनतेच्या हिताचे घेणे-देणे नाही, अशी टिका त्यांनी केली. त्यामुळे यावेळी बदल घडवायचा असे लोकांनी ठरविले असल्याचे ते म्हणाले. प्रभाग क्र.12 (ब) चे उमेदवार विजय गोरडवार म्हणाले, 2011 ते 2016 या काळात मी या प्रभागाचा नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्या 40 वर्षांपासून मी या भागातील समस्या दूर करण्यासाठी लढा देत असतो. त्यामुळे या भागातील समस्यांची मला जाणीव आहे. शिवाय आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारही उच्चशिक्षित असल्याने त्यांना नागरिकांची साथ मिळेल, असा विश्वास गोरडवार यांनी व्यक्त केला.
































