गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने या जिल्ह्याचा विकास होईल, जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील, अशा सर्वसामान्य नागरिकांच्या भावना असताना पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पोरके केले आहे. गुपचूर दौरा करून केवळ अधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेणाऱ्या पालकमंत्र्यांना सर्वसामान्य नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकायला वेळ नाही का? असा सवाल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे.
पालकमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करत असताना सर्वसामान्य नागरिकांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. शेतीला नियमित वीज पुरवठा होत नाही, पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटतो. जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. जिल्हा रुग्णालयात अत्यावशक सोयी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना नागपूर किंवा इतर ठिकाणी हलवावे लागते, पोलीस भरतीच्या युवकांचे प्रश्न आहेत, भाजप सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष झाले मात्र अद्याप ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यात आलेले नाही. शेतकरी, महिला, युवक यांच्या समस्यांना घेऊन जिल्ह्यातील नागरिकांना पालकमंत्र्यांना भेटायचे होते, मात्र सुरक्षेचे कारण दाखवून पालकमंत्री दौरा गुप्त ठेवतात. मात्र आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येताना पालकमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत नाही. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेटल्यामुळे पालकमंत्र्यांना आपल्या जीवाला धोका वाटत असेल तर त्यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि दुसऱ्या सक्रिय व्यक्तीला पालकमंत्रीपद द्यावे, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.