गडचिरोली : प्रदेश काँग्रेसचे सचिव डॅा.नितीन कोडवते आणि डॅा.चंदा कोडवते यांनी अलिकडेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सर्व राजकीय पक्षांनी सुरूवात केली असताना त्यांनी ही भेट घेतली. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी कोडवते दाम्पत्याला कोणता संदेश दिला, याबाबत काँग्रेसच्या वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटवर डॅा.चंदा कोडवते यांनी नशिब आजमावले होते. पण राजकीय अनुभव कमी पडल्याने त्यांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आले नाही. मात्र गेल्या ४ वर्षात त्यांनी मतदार संघातील गावांमध्ये संपर्क वाढवून आपले कार्यकर्ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावरून गेल्या निवडणुकीत झालेल्या चुका दुरूस्त करून पुन्हा तयारीनिशी मैदानात उतरण्याचा डॅा.नितीन कोडवते यांचा मानस असल्याचे दिसून येते. यासाठी युवा कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला आहे. 2024 ची गडचिरोली-चिमूर लोकसभा लढण्याची सुप्त ईच्छाही त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे व्यक्त केली.
विशेष म्हणजे काँग्रेसने ५० टक्के जागांवर युवा उमेदवारांना उभे करण्याचे धोरण काँग्रेसने आधीच जाहीर केले आहे. त्याचाच आधार घेऊन डॅा.कोडवते दाम्पत्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. आता पक्षनेतृत्वाने त्यांना कोणता संदेश दिला हे गुपित मात्र बाहेर येऊ शकले नाही.