देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी अखेर राष्ट्रवादीत

मुंबईत वरिष्ठांसमोर पक्षप्रवेश

देसाईगंज : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना देसाईगंजच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. येथील माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस नेते जेसा मोटवानी, ज्येष्ठ अधिवक्ता संजय गुरू यांनी सपत्निक शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते खा.प्रफु्ल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री इंद्रनिल नाईक (पालकमंत्री, गोंदिया), राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी गडचिरोलीतून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, माजी जि.प.सभापती नाना नाकाडे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी देसाईगंजच्या नगराध्यक्षपदासाठी निता संजय गुरू यांची उमेदवारी सुद्धा जाहीर झाल्याचे समजते.

जेसा मोटवानी हे काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. यापूर्वी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या जाहीर सभेच्या वेळीच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती. यावेळी त्यांनी धर्मरावबाबांची भेट घेऊन चर्चाही केली होती.