जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत घराघरात पोहोचा- विजय वडेट्टीवार

उमेदवार व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

गडचिरोली : निवडणूक ही केवळ प्रचाराची स्पर्धा नसून जनतेच्या विश्वासाची परीक्षा आहे. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत घराघरात पोहोचत त्यांच्याशी संवाद साधा. महायुती सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहोचवा, कार्यकर्त्यांची एकजूट हीच खरी काँग्रेसची ताकद आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

आरमोरी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी वडसा टी-पॉइंट येथे काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी प्रभागनिहाय आढावा घेत वडेट्टीवार यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी वडेट्टीवार म्हणाले, केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या अपयशांवर ठोस पुराव्यासह संवाद साधा, स्थानिक समस्या, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका जनतेसमोर मांडा. वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या सरकारच्या अपयशांना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा. विशेषतः तरुण व महिला मतदारांना प्राधान्य देत त्यांच्यापर्यंत आपल्या पक्षाचा विचार पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आरमोरी क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी संदेश सिंगलकर, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आ.वडेट्टीवार यांनी गडचिरोलीतही काँग्रेसच्या उमेदवारांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.