गडचिरोली : निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून ‘इंडिया’मध्ये काँग्रेसच्या कोट्यात येणाऱ्या मतदार संघात कोण उमेदवार राहील, याची घोषणा आधीच केली जाणार नाही. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरच त्याबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नितीन राऊत यांनी गडचिरोलीत दिली. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक म्हणून प्रथमच या मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी ते आले असताना पत्रकारांशी बोलत होते.
प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांच्या नावांची घोषणा वेळेवर केली जात असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेसचे उमेदवार आधी जाहीर होईल का, असा प्रश्न राऊत यांना केला. मात्र तशी शक्यता नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीला आता तेलंगणाच सांभाळणे कठीण झाल्यामुळे त्यांची महाराष्ट्रातील त्यांच्या एंट्रीची चिंता करण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.
सुरूवातीला त्यांनी लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसोबत क्षेत्रातील सामाजिक समस्या, त्यावर केलेली आंदोलने आदींचा आढावा घेतला. काँग्रेस पक्षासाठी पोषक वातावरण असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी माजी आमदार अविनाश वारजूरकर, लोकसभा समन्वयक डॉ.नामदेव किरसान, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष माजी आ.दिलीप बनसोड, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, माजी आ.पेंटारामा तलांडी, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, महिला सचिव डॉ.चंदा कोडवते, सचिव रवींद्र दरेकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, समशेरखान पठाण, प्रभाकर वासेकर, नीलकंठ निखाडे, रजनीकांत मोटघरे, वामन सावसाकडे, मुस्ताक हकीम, रुपेश टिकले, पपू हकीम, मिलिंद खोब्रागडे, नितेश राठोड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.