गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची आजपासून गावोगावी परिवर्तन पदयात्रा

चपराळा मंदिरातून होणार शुभारंभ

गडचिरोली : लोकसभेचा गड सर केल्यानंतर आता विधानसभेत बाजी मारण्याचा इरादा पक्का करत काँग्रेसने गडचिरोली विधानसभा क्षेत्रावर कब्जा करण्यासाठी कंबर कसली आहे. गावोगावी जनसंपर्क करून वातावरण निर्मिती करण्यासाठी गडचिरोली विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरूवार, दि.19 सप्टेंबरपासून परिवर्तन यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेचा शुभारंभ चामोर्शी तालुक्यातील चपराळा मंदिरापासून होणार आहे.

खासदार डॅा.एन.डी.किरसान, आ.अभिजित वंजारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवा नेते विश्वजित कोवासे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता चपराळा मंदिरापासून या जनसंवाद पदयात्रेला सुरूवात झाल्यानंतर दुपारी 1 वाजता चपराळा गाव, 1.30 वाजता कुनघाडा गाव, 2 वाजता रामनगट्टा, 2.30 वाजता ठाकरी, 3 वाजता इल्लूर, 3.30 वाजता चौडमपल्ली, 4 वाजता चंदनखेडी वन, 4.30 वाजता कन्सोबा मार्कंडा, 5 वाजता आष्टी शहरात ही पदयात्रा पोहोचेल.

पहिल्या दिवशी परिवर्तन पदयात्रा 30 किलोमीटरचा पायी प्रवास करणार असल्याची माहिती यात्रेचे नेतृत्व करत असलेले विश्वजित कोवासे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत क्षेत्रातील सर्व गावे या यात्रेच्या माध्यमातून पिंजून काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.