अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीकडून यावेळी काँग्रेसची दावेदारी

पेंटा रामा तलांडी यांचे कार्यकर्ते तयारीत

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निकालाने गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने लढण्याची तयारी सुरू केली आहे. यात माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. याशिवाय निवृत्त वनअधिकारी हनमंतु मडावी हेसुद्धा काँग्रेसकडून ईच्छुक असल्याचे सांगितले जाते.

विशेष म्हणजे आत्राम घराण्याचा गड मानल्या जाणारे अहेरी विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने बहुतांश वेळा या क्षेत्रात काँग्रेसला उमेदवार उभा करण्याची संधी मिळाली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या क्षेत्रावर वर्चस्व ठेवणारे ना.धर्मरावबाबा आत्राम अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे तूर्त या क्षेत्रासाठी दमदार चेहरा नसल्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदार संघ काँग्रेसकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहे. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या मतदार संघावरील दावा सोडणार नाही आणि काही अनपेक्षित घडामोडी होऊन ओळखीच्या चेहऱ्याला उमेदवारी देऊन उभे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तसे न झाल्यास आणि ही जागा काँग्रेसच्या कोट्यात गेल्यास वेळेवर धावपळ नको म्हणून काँग्रेसकडून तयारी केली जात आहे.

1980 मध्ये तत्कालीन सिरोंचा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटवर निवडून आलेले पेंटा रामा तलांडी यांची गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणूनही निवड झाली. त्यानंतरच्या काळात त्यांच्या पत्नी सगुना तलांडी अवघ्या दिडशे मतांनी पराभूत झाल्या. पण नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढल्याने त्यांना संधी मिळाली नाही. स्वच्छ प्रतिमा, पक्षाशी एकनिष्ठता या जमेच्या बाजु पाहता तलांडी यांना यावेळी पक्ष संधी देईल, अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात आलेले हनमंतु मडावी यांचा पिंड राजकीय नाही. मात्र माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशिल आहेत. पण दिग्गज लोकांच्या लढतीत टिकायचे असेल तर अनुभवी आणि जनमानसात संपर्क व चांगली प्रतिमा असणारा उमेदवारच हवा असा सूर काँग्रेसच्या गोटातून वर्तविला जात आहे.

पक्षाने संधी दिली तर लढणार

मी गेल्या चार-पाच दशकांपासून पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो आहे. कोणतीही अपेक्षा ठेवून काम केले नाही. आता मी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरावे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांच्या भावनेचा आदर करून पक्षाने संधी दिल्यास मी निवडणूक लढेन.

– पेंटा रामा तलांडी (माजी आमदार)