गडचिरोली : चामोर्शी येथे अगरबत्ती प्रकल्प सुरू करून रोजगार देण्याचे आमिष दाखवत भाजपच्या एका नगरसेवकाने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करत काही महिला गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. या महिलांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन महिलांशी संवाद साधला.
या प्रकरणात सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकाचा थेट नामोल्लेख असल्याने तसेच सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे प्रशासनाने या उपोषणाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या उपोषणामुळे काही महिलांची प्रकृती खालावून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ‘देवाभाऊंच्या लाडक्या बहिणीं’वर त्यांच्या पक्षातीलच एका नगरसेवकामुळे उपोषण करण्याची वेळ येणे ही गंभीर बाब असल्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले. सदर प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित उपोषणकर्त्या महिलांवर झालेला अन्याय तत्काळ दूर करावा, अशी मागणी ब्राह्मणवाडे यांनी केली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, विपुल येलटीवार, नंदू कुमरे, पवन गेडाम यांचे सह आंदोलन कर्ते मीनाक्षी पिपरे, देवांगना गौतम, निवृत्ता गवारे, शीला धोडरे, कविता कारडे, सुषमा धोडरे, रेखा गवारे, छाया बोदलकर, वेणू धोडरे, अनिता पिपरे, मनीषा गवारे, सुषमा बुरांडे, अर्चना बुरांडे, शारदा पीपरे, साधना धोडरे, जयश्री पिपरी, वंदना कोठारे, अर्चना धोडरे, अश्विनी गव्हारे, चंद्रशेखर मस्के, आमदास झरकर, नितेश पिपरे, शालिनी पीपरे, मिलिंद भांडेकर आदी उपस्थित होते.
































