गडचिरोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गडचिरोली नगर परिषदेवर सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवून आज काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा गडचिरोलीत होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आ.विजय वडेट्टीवार या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि गडचिरोलीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या प्रांगणात सकाळी 11 वाजता होणाऱ्या या मेळाव्यात महत्वाचे पक्षप्रवेश होणार आहे. याचवेळी काँग्रेसकडून (महाविकास आघाडीचे) नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणाही होण्याची शक्यता आहे.
यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार रामदास मसराम आदी काँग्रेस नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. या निमित्ताने काँग्रेसमधील सर्व नेते एकजूट दाखवणार असून महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे सर्वांमध्ये उत्साह असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले.
































