गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाने आपले अधिकृत उमेदवार उभे केले असताना बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून लढत असलेल्यांवर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यात माजी आमदार आनंदराव गेडाम, डॅा.शिलू चिमुरकर, डॅा.सोनल कोवे, भरत येरमे यांचा समावेश आहे.
आनंदराव गेडाम आणि डॅा.शिलू चिमुरकर हे आरमोरी मतदार संघातून, तर डॅा.सोनल कोवे आणि भरत येरमे हे गडचिरोली मतदार संघात निवडणूक रिंगणात आहेत.
अहेरी मतदार संघाची जागा आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसने बराच प्रयत्न केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) या जागेवरील दावा सोडला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेले हनमंतू मडावी यांनी अपक्ष नामांकन भरून आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करण्यास नकार देत आघाडीधर्म पाळला नाही. मात्र तरीही काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करणे टाळले.
अहेरी मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार असला तरी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसल्यामुळे मडावी यांच्यावरील कारवाई टाळण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अहेरीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहणार, की काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला मदत करणार, अशी कुजबूज सुरू झाली आहे.
आज माजी मुख्यमंत्री बघेल, ना.वडेट्टीवार यांच्या सभा
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या दोन सभा सोमवारी (दि.11) जिल्ह्यात होणार आहे. पहिली सभा सकाळी 11 वाजता कोरची येथे, तर दुसरी सभा महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पोरेटी यांच्यासाठी दुपारी 1 वाजता चामोर्शी येथे होणार आहे.