मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला काँग्रेस करणार चॅाकलेट वाटप

समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला (22 जुलै) काँग्रेस चॅाकलेट आणि लॅालीपॅापचे वाटप करणार आहे. विविध समस्यांनी ग्रासलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मुख्यमंत्र्‍यांनी फक्त मोठमोठ्या आश्वासनांचे चॅाकलेट दिले, पण ती आश्वासने पूर्ण केली नसल्याने त्यांच्या वाढदिवशी चॅाकलेट आणि लॅालिपॅाप वाटणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्‍यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्या दौऱ्यात जिल्ह्यातील युवक, महिला, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधला नाही, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाही, त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना फक्त आश्वासने देण्याचे काम केले, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

जिल्ह्यात सध्या रानटी हत्ती आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप, शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही विद्युत मीटर न लावणे, कर्जमाफी व बोनस वाटप, घरकुल योजनेतील थकीत हप्ते, पदवीधर बेरोजगारांना रोजगार, रिक्त पदांमुळे सामान्य लोकांना होत असलेला त्रास दूर करणे, रखडलेल्या रस्त्यांमुळे होत असलेला त्रास, मेडीकल कॅालेजमधील रखडलेली पदभरती अशा अनेक समस्यांकडे यानिमित्ताने लक्ष वेधले जाणार आहे.

नागरिकांना चॉकलेट व लॉलीपॉपचे वाटप करण्याचा हा उपरोधिक उपक्रम 22 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा काँग्रेस कार्यालयात घेतला जाणार आहे.