गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित बिलांमुळे अडचणींचा सामना करत असलेल्या जिल्हा कंत्राटदार संघटनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. आमच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. त्यामुळे आमची लढाई आम्हालाच लढावी लागणार, असे म्हणत आम्हीही आता निवडणूक लढविणार, असे कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष अजय तुम्मावार यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर सरकारी कामांच्या कंत्राटांची खिरापत वाटण्यात आली. पण त्या कामांसाठी लागणारा निधी अतिशय तोकड्या प्रमाणात दिला. त्यामुळे जिल्ह्यात 1000 कोटींपेक्षा जास्त रकमेची बिलं प्रलंबित आहेत. तुकड्या-तुकड्यांमध्ये बिलांची रक्कम दिली जात आहे. यामुळे कंत्राटदार त्रस्त झाले आहेत.

आमच्या मदतीसाठी ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची त्यांच्याकडून अपेक्षाभंग होतो. सत्तेत असणारेही मदत करत नाही. त्यामुळे आमच्या हक्काची लढाई आता आम्ही स्वत:च लढणार, असे म्हणत कंत्राटदार संघटनेने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.












