निवडणुका आल्या की लोकं घराबाहेर पडतात, मंत्री धर्मरावबाबा यांची टीका

जारावंडीतील मेळाव्याला उसळली गर्दी

एटापल्ली : जनतेचे सेवक हे नेहमीच मैदानात असतात. 2019 ची विधानसभा निवडणूक झाल्यावर एकही नेता मैदानात दिसला नाही. आजपर्यंत कोण कुठे लपून बसला हेच कळत नाही. मात्र विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच काही लोकं घराबाहेर पडताना दिसत आहेत, अशी बोचरी टीका राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली.

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, राकॉचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, जारावंडीच्या सरपंच सपना कोडापे, उपसरपंच सुधाकर टेकाम, सरखेडाच्या सरपंच वर्षा उसेंडी, घोटसूरचे सरपंच कोरामी, दिंडवीचे उपसरपंच कौशिक आवडे, तोहागावचे सरपंच जगुजी देहारी, माजी जि.प. सदस्य संजय चरडुके, माजी जि.प. सदस्य रामजी कत्तीवार, एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती जनार्दन नल्लावार, अहेरीचे माजी पं.स. सदस्य मांतय्या आत्राम, पापा पुण्यमूर्तीवार, कैलास कोरेत, कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत, बाळू राजकोंडावार, दसरू मट्टामी, घनश्याम नाईक, इशांत दहागावकर, श्रीहरी मोहुर्ले, मल्लाजी येनगंटीवार, ज्ञानदेव मडावी, उत्तम चौधरी, अनिल ठाकरे, गुरुदास टिंगुसले, गजानन गुरनुले, महेश कोडापे, शितल इष्टाम, विश्वनाथ इष्टाम आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री धर्मरावबाबा म्हणाले, गेल्या पाच वर्षात आपल्या विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी पाहिजे तो निधी उपलब्ध करून दिल्याने अनेक कामे झाली आणि बरीच प्रगतीपथावर आहेत. महायुती सरकार स्थापन झाल्यावर केवळ विधानसभा क्षेत्राचाच विचार न करता संपूर्ण जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले. पावसाळ्याच्या तोंडावर काही रस्त्याचे आणि पुलाचे काम हाती घेतल्याने नागरिकांना थोड्याफार अडचणींना सामोरे जावे लागले. हे खरे असले तरी विकास कामे झपाट्याने होत आहेत. पण कधी घरातून बाहेर न पडलेले विरोधक आता घराबाहेर पडून रस्त्यावरील खड्ड्यांबाबत बोलत आहेत. आता त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे उरले नाही. महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा कल महायुतीकडे वळत आहे. त्यामुळे विरोधक हैराण झाले आहेत. मी सर्वसामान्य जनतेच्या सेवेत कालही होतो, आज आहे आणि नेहमीच राहणार असल्याचे धर्मरावबाबा म्हणाले.

दुर्गम भागातील नागरिकांची समस्या जाणून घेतल्या

जरावंडी येथील कार्यकर्ता मेळाव्याला दुर्गम भागातून आलेल्या नागरिकांशी आस्थेने संवाद साधून मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांची निवेदने स्वीकारत समस्या जाणून घेतली. यावेळी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे आणि गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांना पाचारण करून त्वरित नागरिकांची समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते परिसरातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले.