चामोर्शी : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीऐवजी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी चामोर्शीतून सुरू केलेल्या जनकल्याण यात्रेत जाहीर भाषणातून मित्रपक्ष असलेल्या भाजपवर आगपाखड केली. विधानसभा निवडणुकीत पुतणे अम्ब्रिशराव यांना माझ्याविरूद्ध लढण्यासाठी 5 कोटी देऊन मला पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी भाजपवर केला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर जिल्हा परिषदेच्या 51 पैकी 32 जागा मागू; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढेल,” अशी ठाम भूमिका आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मांडली. अहेरीत इतर पक्ष आहेतच कुठे? असे विचारत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर उपरोधिक टीका केली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी धर्मरावबाबांनी सहपालकमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे) नेते आशिष जयस्वाल यांच्यावरही टिका करत ते आपल्या क्षेत्रात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता. आता भाजपवरही टिका केल्याने त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निश्चय केल्याचे मानले जात आहे.

चामोर्शी नगरपंचायतच्या प्रांगणात झालेल्या जनकल्याण यात्रेच्या या सभेला आमदार अमोल मिटकरी, सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्य तथा रायुकाँच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, महिला जिल्हाध्यक्ष डॉ.सोनल कोवे, माजी जि.प. उपाध्यक्ष डॉ.तामदेव दुधबळे, लौकिक भिवापुरे, नाना नाकाडे, तालुकाध्यक्ष निशांत नैताम, नगरसेवक राहुल नैताम, रिंकू पापडकर, ॲड.डिंपल उंदिरवाडे, डॉ.नोमेश जुवारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सभेपूर्वी शहरातून पायी रॅली काढण्यात आली.

‘कोनसरी येथील लोहनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळायला हवा. भेंडाळा परिसरातील 14 गावांची जमीन उद्योगासाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. एक इंचही जमीन जाऊ देणार नाही; कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही,’ असा इशारा आत्राम यांनी यावेळी दिला. सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- मिटकरी

पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, मात्र महायुती सरकारने भरीव मदत केली असून पुढेही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. गडचिरोली हा क्रांतीचा आणि संघर्षाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार खंबीरपणे सोबत आहे, असे त्यांनी सांगितले.












