स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कसली कंबर

धर्मरावबाबा जिल्हाभर फिरणार

गडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पावसाळा आटोपताच नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टिने जिल्ह्यात सर्वच पक्षांचे पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात नवी उभारी देण्यासाठी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.धर्मरावबाबा आत्राम हेसुद्धा 4 जूनपासून 10 दिवस जिल्ह्यात सर्वत्र फिरून ठिकठिकाणी पक्षाचे मेळावे घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर काहीसे शांत झालेले धर्मरावबाबा आत्राम गेल्या काही दिवसांपासून मणक्याच्या आजारावर उपचार घेत होते. या उपचारानंतर ते जिल्ह्यात पुन्हा सक्रिय होत आहेत. 4 जून रोजी दुपारी 3 वाजता धर्मरावबाबा नागपूर येथून गडचिरोलीत पोहोचतील. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर शासकीय विश्रामगृहावर ते मुक्कामी राहतील. त्यानंतर दि.5 पासून दि.13 पर्यंत ते कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, अहेरी, धानोरा, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, चामोर्शी या तालुक्यांचा दौरा करून कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतील.

विधानसभा निवडणुकीच्या आधी धर्मरावबाबांच्या कन्या तथा माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षात प्रवेश घेऊन बाबांविरूद्ध विधानसभा निवडणुकही लढली. त्यांच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे धर्मरावबाबांना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाची नवी फळी जिल्ह्यात निर्माण करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी धर्मरावबाबांचा हा जिल्ह्यातील बाराही तालुक्यांचा दौरा महत्वाचा मानला जातो.