अहेरी : लोकांचे कल्याण व्हावे आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्यातील महायुती सरकारने अनेक ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. लोकाभिमुख योजना आणखी प्रभावीपणे राबवून तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मला बरेच काही करायचे आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत खंबीरपणे पाठिशी राहून मला साथ द्या, असे आवाहन महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
अहेरी तालुक्यातील इतलचेरू, तानबोडी, किष्टापूर (वेल), बोटलाचेरू, वेलगुर, वेलगुरटोला, रामय्यापेठा, मोद्दुमाडगू, मद्दीगुडम आदी ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन ना.आत्राम यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यात त्यांनी हे आवाहन केले.
कॉर्नर सभेत धर्मरावबाबा म्हणाले, अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी दिड हजार रुपये प्राप्त होत आहेत. महिलांनी स्वावलंबी, सक्षम व्हावे, स्वाभिमानाने जगावे यासाठी महायुती शासनाच्या या अभिनव योजना आहेत. या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि या भागात रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी मलाच संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.
‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ आहे. त्यामुळे मागील 50 वर्षापासून जनसेवा अविरत, अविश्रांत व सातत्याने करीत आहे असे सांगून धर्मरावबाबा यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासात्मक कामांची माहिती दिली.
कॉर्नर सभेदरम्यान विविध गावातील गावकऱ्यांनी आदिवासी संस्कृती, परंपरेनुसार ढोल, ताशे, वाजंत्री आणि फुलांचा वर्षाव करून त्यांचा जयघोष केला.