पक्ष फोडणारे आता घर फोडायला निघाले, धोका देणाऱ्यांना माफी नको

धर्मरावबाबांनी मोकळी केली धुसफूस

Oplus_0

गडचिरोली : पक्ष फोडणारे आता घर फोडायला निघाले आहेत. विधानसभा निवडणुकीत माझ्याच विरोधात माझ्या घरून (भाग्यश्री आत्राम-हलगेकर) उमेदवार देण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे माझ्या नावाचा वापर करून इतर कोणीही वेगळे राजकारण करत असतील तर त्यांना धडा शिकवा. मला धोका देणाऱ्यांना माफ करू नका, असे आवाहन करत मंत्री धर्मरावबाबा यांनी कौटुंबिक धुसफुसीला वाट मोकळी करून दिली.

आलापल्लीत ‘जनसन्मान यात्रे’च्या समारोपीय कार्यक्रमात ते जाहीरपणे बोलत होते. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या मार्गदशनात अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात पद निर्मिती करून त्या रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच करावे, जवळजवळ 20 वर्षांपासून आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना न्याय देण्यासाठी निधीची तरतूद करावी, एवढेच नव्हे तर गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता आपली तिजोरी उघडा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांकडे केली. तसेच माझे आदिवासी बांधव सदैव आपल्या पाठीशी राहतील, अशी ग्वाही दिली.

शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम यांना धर्मरावबाबांविरूद्ध विधानसभा निवडणुकीत उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वडीलांविरूद्ध मुलीला उभे करण्याच्या या प्रयत्नामुळे दुखावलेल्या धर्मरावबाबांनी अखेर या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच आपले मन मोकळे केले. एका मुलीने साथ सोडली तरीही दुसरी मुलगी, मुलगा, भाऊ माझ्यासोबत असल्याचे ते म्हणाले.