गडचिरोली : राज्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (एपी) बुधवारी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्या पहिल्याच यादीत अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना अहेरी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांना धर्मरावबाबांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरावे लागणार असल्याने भाजपच्या तिकीटाची आशा लावून बसलेल्या अम्ब्रिशराव आत्राम यांचा भ्रमनिरास झाला आहे. आता निवडणुकीसाठी ते कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धर्मरावबाबा यांनी आतापर्यंत सात वेळा विधानसभेची निवडणूक लढविली आहे. त्यापैकी चार वेळा ते विजयी झाले. या चारही वेळा त्यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांच्यासोबत गेलेल्या धर्मरावबाबांना पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. गडचिरोली जिल्ह्याला मिळालेले हे पहिले कॅबिनेट मंत्रीपद ठरले. आता आठव्या वेळी अनेक आव्हाने पेलत धर्मरावबाबा पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे 29 आॅक्टोबरला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सरपंचपदापासून राजकारणाची सुरूवात करणारे धर्मरावबाबा 50 वर्षांपासून राजकारण करत आहेत. स्थानिक पातळीवर बोलल्या जाणाऱ्या गोंडी, मराठी, हिंदी या भाषांसह इंग्रजीवर प्रभुत्व असल्याने ते सर्वांसोबत संवाद साधून त्यांना आपलेसे करतात हा त्यांचा प्लस पॅाईंट आहे. त्याचा फायदा त्यांना ग्रामीण, दुर्गम भागातील लोकांची मते मिळवण्यासाठी होऊ शकतो.
तिकडे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या नाग विदर्भ संघ समितीच्या (नाविसं) झेंड्याखाली निवडणूक रिंगणात उतरतात, की महाविकास आघाडी त्यांना आपला उमेदवार करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) तिकीटसाठी आशा लावून आहेत. मात्र काँग्रेसने या जागेसाठी जोर लावल्याने हा पेच अद्याप सुटलेला नाही.