महाविकास आघाडी विरूद्ध महायुती, थेट लढतीत कोण वरचढ होणार?

तिसऱ्या स्थानासाठी तीन पक्षांमध्ये चढाओढ

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात रिंगणात असलेल्या १० उमेदवारांपैकी तीन उमेदवार राष्ट्रीय पक्षांचे आहेत. तर चार नोंदणीकृत प्रादेशिक पक्षांचे आहेत. याशिवाय तिघे अपक्ष आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या मतदार संघांमध्ये सर्वात कमी उमेदवार गडचिरोली-चिमूर या मतदार संघात आहेत. त्यातही खरी लढत महाविकास आघाडी आणि महायुती अशीच होणार आहे. त्यामुळे कोणाच्या बाजुने समीकरणे जुळून येतात, कोणते मुद्दे वरचढ ठरून कोणाला तारक आणि मारक ठरतात, याची वातावरण निर्मिती होण्यास सुरूवात झाली आहे.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॅा.नामदेव किरसान हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. अभ्यासू आणि उच्चशिक्षित उमेदवार अशी त्यांची प्रतिमा असून गेल्या सहा वर्षात त्यांनी सातत्याने मतदार संघात ठेवलेला जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. पण अलिकडच्या काळात काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ त्यांच्यासाठी काही प्रमाणात नुकसानकारक ठरू शकते. असे असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे भक्कमपणे पाठिशी उभे राहिल्यास त्यांना विजयश्री खेचून आणणे अशक्य नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात उमटत आहे.

दुसरीकडे महायुतीचे उमेदवार असलेले भाजपचे नेते आणि विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यापुढे सुरूवातीला बरेच अडथळे निर्माण झाले होते. पण पक्षाचे बुथनिहाय नेटवर्क, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्यासह लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या तीनही आमदारांची साथ यामुळे खा.नेते यांच्यासाठी विजयाचे गणित सोडविणे सोपे होणार आहे. याशिवाय बसप, बीआरएसपी आणि वंचितच्या उमेदवारांमध्ये मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फायदा खा.नेते यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नकारात्मक मुद्द्यांनी डोके वर न काढल्यास खासदारकीची हॅटट्रिक करण्याचा त्यांचा मार्ग सुकर होणार आहे.

हे 10 उमेदवार आहेत रिंगणात

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांमध्ये अशोक महादेवराव नेते (भारतीय जनता पक्ष), डॉ.नामदेव दसाराम किरसान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), योगेश नामदेवराव गोन्नाडे (बहुजन समाज पार्टी), नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये धीरज पुरूषोत्तम शेडमाके (जनसेवा गोंडवाना पार्टी), बारीकराव धर्माजी मडावी (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी), सुहास उमेश कुमरे (भीमसेना), हितेश पांडूरंग मडावी (वंचित बहुजन आघाडी, तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये करण सुरेश सयाम, विलास शामराव कोडापे आणि विनोद गुरुदास मडावी यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी दिली.